राजस्थान : राजस्थानमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दुपारी झालेल्या या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २० जखमी झाले आहेत. लक्ष्मण गड परिसरात लक्ष्मण गड कल्व्हर्टवर प्रवाशांनी भरलेली खासगी बसचा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस अनियंत्रित झाली आणि पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. यात बसचे चालकाच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये जवळपास ४० जण प्रवास करत होते.
पोलिसांना अपघाताची महिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना लक्ष्मण गड आणि सीकर येथील रुग्णालयात दाखल केलं. तर मृत झालेल्या व्यक्तींना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सीकर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवार दुपारी २ वाजता झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस अचानकपणे अनियंत्रित झाली आणि त्यातून हा अपघात झाला आहे.
पुलावर येताच बस इकडून तिकडे होत होती, त्याचवेळी बस पुलाच्या कठड्याला धडकली. त्यामुळे बसच्या एका बाजुचं मोठे नुकसान झालं आहे. या अपघातानंतर बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. सुचना मिळाल्यानंतर सीकरचे पोलीस उपायुक्त शाहीन सी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रतन कुमार हे घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास केला जात आहे.
पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर २० पेक्षा अधिक लोक जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर योग्य उपचार करा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटननंतर शोक व्यक्त केला आहे. जखमींना योग्य उपचार करा अशा सुचना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दिल्या आहेत.