नवी दिल्ली: आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याविना रवाना होणार आहे. या परिस्थितीत बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हंगामी प्रशिक्षकपद भूषवू शकतात. भारतीय संघ १० नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. यामुळेच गंभीर आफ्रिकेला जाणार नाहीत. लक्ष्मण यांची नियुक्ती बीसीसीआयने अद्याप अधिकतपणे जाहीर केलेली नाही.
लक्ष्मण यांच्यासोबत एनसीएचे कर्मचारी आणि इतर प्रशिक्षकही आफ्रिकेला जाणार आहेत. यामध्ये साईराज बहुतुले, ऋषिकेश कानिटकर आणि सुभदीप घोष यांचा समावेश असेल. या तिघांनी नुकत्याच ओमानमध्ये खेळल्या गेलेल्या इमर्जिंग आशिया कपमध्ये भारत ‘अ’ संघाला मार्गदर्शन केले होते. आफ्रिका दौऱ्यातील पहिली लढत ८ नोव्हेंबरला रंगेल. मालिकेतील पुढील तीन सामने त्यानंतर १०, १३ आणि १५ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहेत.