पुणे : सिंहगड किल्ल्यावरील झुंझार बुरुजाजवळ भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांना डोंगर उतारावर एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पर्यटकांनी तत्काळ संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधल्यावर मृतदेहाला दरीतून वर काढण्यास यश आले. संबंधित व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.27) इंद्राणी बालन फाउंडेशनचे सुरक्षारक्षक श्रीकांत लांघी आणि हर्षद गायकवाड सकाळी साफसफाई करत होते. तेव्हा त्यांना काही पर्यटक बुरुजाजवळ फिरताना दिसले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना बुरुजाजवळ मधमाशांचे पोळे असल्याकारणाने फिरण्यास विरोध केला. तेव्हा या कर्मचाऱ्यांना दरीत एक व्यक्ती पडलेली असल्याचे समजले. त्यावेळी पोलीस व आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच वनपाल आणि वनव्यवस्थापन समितीशी संपर्क साधण्यात आला. राजगड पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथकाने धाव घेतली. यानंतर खोल दरीत पडलेला मृतदेह काढण्यात आला.
पोलीसांना संबंधित व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. प्राथमिक तपासणी करताना त्यांच्या शर्टमध्ये शनिवारी काढलेले स्वारगेट ते डोणजे असे बसचे तिकीट सापडले आहे. परंतु, व्यक्तीचे नाव, पत्ता अशी माहिती अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.