बारामती : अजित पवारांना सगळं दिलं. उपमुख्यमंत्रिपदही दिलं. तरीही अजित पवारांनी पक्ष, चिन्हं सगळं चोरून नेलं, घरफोडी केली आणि माझ्या सुप्रिया सुळे यांना काहीच दिलं नाही. आज तिने माझी साथ दिली. तसेच टीका करताना अजित पवारांची नक्कलही केली. आज युगेंद्र पवार यांच्या पहिल्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा पार पडली. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यावरून शरद पवारांनी भर सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, शरद पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, हा प्रश्न भावनेचा नाही. हा मुद्दा तत्त्वाचा आणि विचारांचा आहे. आम्ही गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेतले आहेत. मी याच विचारांनी काम करतो. गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण, ज्योतीराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या सर्वांची विचारधारा ही माझी विचारधारा आहे. या विचारधारेसाठी मी काम करत आहे, हीच माझी पद्धत आहे, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
पुढे म्हणाले, मी गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक तालुके पालथे घातले आहेत. कारण मला महाराष्ट्रातील सत्ता बदलायची आहे. राज्याची सत्ता सामान्यांच्या हाती द्यायची आहे. ते करायचं असेल तर तुम्ही-आम्ही एकजुटीने आपली शक्ती उभी केली पाहिजे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच घरात दोन भाऊ असतील तर एकाने शेती आणि दुसऱ्याने नोकरी करायची असते. आम्ही सत्ता लोकांसाठी वापरली, आम्ही रोजगार दिले. बारामतीत मलिदा गँग शब्द आहे. आम्ही ही गँग कधी वाढू दिली नाही, असंही शरद पवार यांनी म्हटले आहे.