मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्धीकी आणि अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर झिशानवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या काळात सलमान खान झिशानला भावनिक आधार देत असल्याचे त्याने सांगितलं. झिशान सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यातही खूप चांगलं नातं आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे.