मुंबई : काँग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीमध्ये एकूण सहा नावांचा समावेश केला आहे. त्यापैकी चार उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. तर, दोन उमेदवार झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आहेत. दरम्यान, काँग्रेसने नव्या यादीमध्ये एक उमेदवार बदलला आहे. त्यामुळे काँग्रेसने आतापर्यंत १०३ शिलेदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.
काँग्रेसने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून साजिद खान मन्नन खान यांना. तर, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. पक्षश्रेष्ठींनी येथून आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता त्यांच्याऐवजी मधुरीमाराजे छत्रपती यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे. यासह काँग्रेसने कुलाब्यामधून हिरा देवासी यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रातील या मतदारसंघाचा समावेश
- अकोला वेस्ट – साजीद खान मन्नान खान
- कुलाबा – हिरा देवासी
- सोलापूर शहर मध्य – चेतन नरोटे
- कोल्हापूर उत्तर – मधुरिमाराजे छत्रपती