बापू मुळीक / सासवड : पुरंदरच्या आमदारांनी पाच वर्षात स्वतःच्या कर्तुत्वाने एक प्रकल्प तालुक्यात आणला नाही. उलट मोठ्या प्रकल्पांना विरोध करून तालुका दहा वर्ष कुजवला. पाच वर्ष बेसुमार थापा मारल्या. पुरंदरच्या भूमीला संभाजी महाराज, अत्रे, फुले, उमाजी नाईक अशा कर्तुत्ववान लोकांचा वारसा आहे. तिथे इतका बंडलबाज आमदार व्हावा हे दुर्दैवी आहे.
पाच वर्षात पुरंदर हवेलीच्या प्रश्नांवर विधानसभा गाजवायची संधी असताना आमदार कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातले प्रश्न विधानसभेत विचारात बसले, अशा शब्दात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांची धुलाई केली. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवतारे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जंगी सभेत ते बोलत होते.
यावेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक संजय मिस्कीन, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी आमदार संभाजी कुंजीर, बाबाराजे जाधवराव, भाजपचे निलेश जगताप, संदिप हरपळे, दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, अतुल म्हस्के, ममता शिवतारे, पंकज धिवार, बळीराम सोनावणे, विनस शिवतारे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
यावेळी विजय शिवतारे म्हणाले कि, आमदारांनी एकतरी प्रकल्प आणल्याचे कुणीही दाखवावे. वायरमन ऐकत नाही म्हणून उपोषणाला बसणारा आमदार गुंजवणी, विमानतळ, आयटी पार्क, राष्ट्रीय बाजार असे डोंगरा एवढे प्रश्न काय सोडवणार असे सांगत शिवतारे यांनी आमदारांनी दिलेल्या आश्वासनांची जंत्रीच वाचून दाखवली.
स्वतःचे १२०० कोटी घालवून गुंजवणीचे पाणी आणतो, शंभूसृष्टीला १६ एकर जमीन देतो, पुरंदर उपसाचे एक कोटीचे बिल भरतो, भावाच्या माध्यमातून हवेलीचा टॅक्स प्रश्न सोडवतो, जेजुरी गडावरच्या पूजा दीड महिन्यात सुरु करतो, दिव्यांग भवन उभारतो, पुण्या मुंबईत विद्यार्थ्यांसाठी होस्टेल बांधतो, तालुक्यात कांदाचाळी बांधतो, खानवडीत नॉलेज सिटी उभारतो, सासवडला बस डेपो बांधतो यापैकी कोणती आश्वासने आमदारांनी पाळली ते सांगावे असेही शिवतारे यावेळी म्हणाले.
यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे म्हणाले कि, संजय जगताप यांचे दिवस भरले असून शिवतारे यांच्याशिवाय पुरंदर हवेलीच्या प्रश्नांना कुणीच न्याय देऊ शकत नसल्याचे सांगितले. बाबाराजे जाधवराव म्हणाले, भारतीय जनता पक्ष ही निवडणूक गांभीर्याने घेत असून शिवतारे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ता प्रामाणिकपणे झटेल.
माजी आमदार संभाजी कुंजीर यांनीही शिवतारे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. संजय जगताप हा विकासातील गतिरोधक – निलेश जगताप यांनी आमदार संजय जगताप हे काडीच्या कामाचे नाहीत. सासवड शहरात पाच वर्षात केवळ रस्त्यावरील अजब प्रकारचे गतिरोधक करण्यापलीकडे काहीच काम त्यांनी केले नाही. पुरंदर हवेलीच्या विकासातील संजय जगताप हा मोठा गतिरोधक आहे. या निवडणुकीत जनताच हा गतिरोधक उखडून टाकेल, अशा शब्दात भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी जगताप यांचा खरपूस समाचार घेतला.