पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील जवळपास सर्वच मतदार संघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. कोथरूड मतदारसंघात पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. या मतदार संघातून भाजपने चंद्रकांत पाटील आणि मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचाही या मतदारसंघात उमेदवार ठरला आहे.
आज दुपारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोथरूड विधानसभा मतदार संघातून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी घोषित केली आहे. चंद्रकांत मोकाटे यांच्या उमेदवारीमुळे कोथरूड विधानसभा मतदार संघात चंद्रकांत मोकाटे, चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे अशी तिरंगी लढत होणार आहे.
कोथरूडमधील उमेदवार म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत पृथ्वीराज सुतार यांच्या नावाची देखील चर्चा होती. पण अखेर चंद्रकांत मोकाटे यांना संधी देण्यात आली आहे. तर कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर रिंगणात असणार आहेत. दरम्यान, खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे याच मतदार संघात वास्तव्यास आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची होणार असं बोललं जात आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वच राजकीय मंडळींच लक्ष असणार आहे.