अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : इनामगाव ता. शिरूर येथील वाळुंजपट व घाडगेमळा, समर्थनगर परिसरात चोरटयांनी धुमाकूळ घालत तब्बल नऊ बंगले फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला असून, एका रात्रीत नऊ बंगल्यात चोरी. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पूर्व भागातून होत आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घाडगेमळा येथे चोरट्यांनी चोरी करण्यास सुरवात केली. तब्बल दोन तास चोरट्यांनी गावात धुमाकूळ घालत अनेक बंगले लक्ष्य करत चोरी केली आहे.
इनामगाव येथील विठ्ठल सीताराम उंडे यांच्या घरातील दोन भार वजनाचे पैंजण, अडीच ग्रॅम वजनाचा बदाम, रोख दहा हजारांची रक्कम, तसेच शिवाजी जाधव यांची पाच हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. तसेच, लक्ष्मण शिंदे, किसन बोरकर, नंदू मामा घाडगे, शंकर घाडगे, किसन यशवंत बोरकर, श्यामराव वाळुंज यांचे बंगले कटावणीच्या साहाय्याने फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला आहे.
गणेश पोपट घाडगे यांचा बंद असलेला बंगला चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या साहाय्याने तोडला. गणेश यांच्या घरातील सामानाची उचकापाचक केली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे चोरी करताना चोरट्यांनी अनोखी युक्ती वापरत अनेक बंगल्याचा मुख्य दरवाजा न तोडता मागील बाजूस असलेल्या किचनचा दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.
परंतु, अनेक ठिकाणी घरातील सदस्य जागे झाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. प्रशासनाला माहिती देताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सातत्याने परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिस प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.