मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार तसेच निवृत्तीवेतन यंदा ३१ ऑक्टोबरऐवजी २५ ऑक्टोबर रोजीच देण्यात आले. संगणक प्रणालीचे हस्तांतरण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. वित्त विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले.
वित्त विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ट्रेझरीनेट संगणक प्रणालीचे डेटा मॅनेजमेंट होस्टिंगचे काम टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडमार्फत करण्यात येते. आता हे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही सर्व प्रणाली बंद ठेवावी लागणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार तसेच निवृत्तीवेतन यास विलंब होऊ नये यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी देण्यात येणारा पगार व निवृत्तीवेतन २५ ऑक्टोबरला देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खात्यात जमा करण्यात आले.