योगेश शेंडगे / शिक्रापूर : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर पिस्टल बाळगल्या प्रकरणी बाभुळसर येथील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुशांत रमेश कराळे (वय २७ वर्षे, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आज (दि. २६) कारेगाव कर्डे रोडलगत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील औद्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातुन अवैधरित्या पिस्टल सारखे अग्नीशस्त्रे मागविले जातात. पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी अशा प्रकारे अवैधरीत्या अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींबाबत माहिती काढून कारवाई करणे बाबत तपास पथकास सुचना दिल्या.
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कारेगाव कर्डे रोडलगतच्या निर्जन स्थळी सुशांत कराळे हा पिस्टल बेकायदेशीरपणे जवळ बाळगुन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार महादेव वाघमोडे यांनी पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा.फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. विलास आंबेकर यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३५ हजार ५०० रुपये किंमतीचे एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल, व एक जिवंत काडतुस मिळून आले. याप्रकरणी आरोपी सुशांत कराळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगीरी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक, रमेश चोपडे, उपविभागीय पो. अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. विलास आंबेकर यांनी केली आहे.
दरम्यान, सुशांत रमेश कराळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द यापुर्वी खुनाचा व आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीकडून यापुर्वी देखील फेब्रुवारी २०२४ मध्ये अशाच प्रकारचे एक पिस्टल बाळगले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. सदर आरोपीविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असुन त्याला लवकरच पुणे जिल्ह्यातुन तडीपारीचा आदेश काढण्यात येणार आहे. तसेच सदर आरोपीने पिस्टल कोणाकडुन आणले व त्याचा पिस्टल बाळगण्याचा नेमका काय उद्देश आहे. याबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.