नाशिक : नाशिक येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या नांदगावमध्ये तिघांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बाणगंगा नदीपात्रात घडली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अंबादास केरुबा खरात (वय-२९ ), इंदुबाई बापू विटणर (वय-३५ ) आणि वाल्मीक बापू विटणर (वय-१५) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बाणगंगा नदीतील पाण्यात मेंढ्या धुण्यासाठी एक मुलगा गेला होता. मेंढ्या धुवत असताना त्याचा पाय घसरून पडला. मुलाला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मुलगा पाण्यात बुडू लागला.
दरम्यान, त्यावेळी त्या मुलाची आई आणि मामा त्याला वाचवण्यासाठी गेले. मात्र, दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेतील तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून, तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.