पुणे: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात मतदारांना प्रलोभन दाखविणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६ कोटी ५९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोसरी व हडपसर मतदारसंघांत मतदारांना प्रलोभन दाखविल्यावरून दोन गुन्हे दाखल केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील हडपसर, शिरूर, खडकवासला व दौंड या चार मतदारसंघांमध्ये ५ कोटी ४५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर तब्बल ७३ लाख ९९ हजार रुपयांचे १ लाख २५ हजार ७० लीटर मद्य जप्त करण्यात आले आहे. भोसरी, चिंचवड, कोथरूड, मावळ, पुरंदर, वडगावशेरी मतदारसंघांतून एकूण ६ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून, त्याचे बाजारमूल्य ६१ लाख ९३ हजार इतके, तर कसबा पेठ मतदारसंघात ४७९ भेटवस्तू जप्त केल्या आहेत. त्याची किंमत १ लाख ५८ हजार रुपये इतकी आहे. अन्य जप्त केलेल्या वस्तूंची संख्या ४ हजार ७०८ इतकी आहे. त्याची किंमत ३२ लाख रुपये इतकी असून एकूण किंमत ६ कोटी ५९ लाख ५ हजार ७५. इतकी आहे