पुणे : दहा वर्ष उलटूनही यवत येथील बसथांब्याअभावी प्रवासी उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे. पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे व मोठी लोकसंख्या असलेले गाव म्हणून यवत गावाची राज्यात ओळख आहे. यवत येथून पुणे, मुंबई, सोलापूर यांसह आदी भागात जाणाऱ्या प्रवाशांना बसथांबा नसल्याने भर उन्हात ताटकळत थांबण्याची वेळ राजकीय नेते, स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आली आहे.
विशेषत यवतसह खुटबाब, राहु, भांडगाव, उंडवडी आदी भागातील प्रवासी नोकरी, व्यवसाय, विविध कामांसाठी पुणे शहरात जात असतात. याबरोबरच एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक आहे. पुणे सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरण कामादरम्यान रस्त्याच्या दुतर्फात असणारी मोठं मोठ्या झाडाची बेछूट कत्तल करण्यात आली आहे. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे सावली देणारी मोठी झाडे तोडली असल्याने प्रवाशांना कोणताच आधार राहिलेला नाही. त्यामुळे येथे दोन्ही बाजूला प्रवासी शेड बांधण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पुणे सोलापूर या मार्गाचे चौपदरीकरण १० वर्षापूर्वी झाले असून महामार्गावर ठिकठिकाणी बस थांबे असणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हात वाहनाच्या प्रतीक्षेत तासन तास उभे राहून प्रवाशांना चक्कर येण्याचे प्रकार देखील पहावयास मिळतात. महामार्ग होण्याआधी रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या झाडांच्या सावलीखाली प्रवासी थांबत होते, परंतु चौपदरीकरणामुळे झाडे तोडण्यात आल्याने आता बस थांब्याअभावी जनतेचे हाल होत आहेत. यवत चौफुलासह अनेक ठिकाणी उभे राहण्यासाठी प्रवासी शेड नसल्याने हाल होत आहेत. परिणामी महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रवासी शेड उभारली जावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. परिसरात पाणी पिण्याची देखील कोणतीही सोय उपलब्ध नाही.
दरम्यान, प्रवासी बसच्या प्रतिक्षेत भर रस्त्यात महामार्गावर थांबतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वातावरणातील बदलामुळे सध्या उन्हाच्या झळादेखील वाढू लागल्याने प्रवाशांना बसथांब्यावर थांबणे असह्य होत आहे. विशेषतः लहान मुले, महिला व वयोवृद्ध प्रवाशांना नाहक त्रास करावा लागत आहे. या ठिकाणी गेल्या १० वर्षापासून अधिक काळ लोटला तरी एस. टी थांबा का उभारला नाही? असा प्रश्न नागरिक व मतदार उपस्थित करीत आहेत. तरी यवत व चौफुला येथे तात्काळ निवारा उभारावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.