पुणे: महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईनद्वारे विविध पर्याय उपलब्ध असतानाही गेल्या सहा महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब ग्राहकांनी वीजबिलांपोटी दिलेले ४१ कोटी ८९ लाख रुपयांचे १६ हजार १४१ धनादेश विविध कारणांमुळे अनादरीत (चेक बाऊन्स) झाले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून तब्बल १ कोटी २१ लाख ५ हजार ७५० रुपयांचा नाहक दंड तसेच १.२५ टक्के विलंब आकार शुल्क देखील भरावे लागले आहे.
त्यामुळे धनादेशाऐवजी घरबसल्या ऑनलाइन वीजबिल भरणा फायद्याचे झाले आहे. पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत गेल्या सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार ५४३ धनादेश अनादरीत झाल्याने बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेसचे ९४ लाख ७ हजार २५० रुपये भरावे लागले आहे. तर साताऱ्यात ४८८ धनादेश अनादरीत झाल्याने ३ लाख ६६ हजार रुपये, सोलापूर- ८९४ धनादेश अनादरित झाल्याने ६ लाख ७० हजार ५०० रुपये, कोल्हापूर- १७२२ धनादेश अनादरीत झाल्याने १२ लाख ९१ हजार ५०० आणि सांगली जिल्ह्यात ४९४ धनादेश अनादरित झाल्याने ३ लाख ७० हजार ५०० रुपये ग्राहकांना भरावे लागले आहे.
वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइनसह ईसीएस, एनईएफटी, आरटीजीएस असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात दरमहा सरासरी २६९० धनादेश अनादरित झाले आहेत. त्यामुळे लघुदाब ग्राहकांनी धनादेशाऐवजी ऑनलाइनद्वारे योजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.