मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. अशातच महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. काही जागांवरून आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरू आहेत. महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चा सुरू असताना तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार यादीबाबत मोठी माहीती समोर आली आहे. ठाकरे गट आता जाहीर केलेल्या यादीतून काही उमेदवार बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाने पहिल्या यादीत 65 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीमध्ये आता बदल होणार आहे. त्यामुळे यादीत नावे आलेले उमेदवार गॅसवर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काही मोजक्या जागांवर तिढा कायम आहे. तिढा असलेल्या जागांवर सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून या उमेदवारांवरून एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीमध्ये यात 65 जागा ज्या शिवसेना ठाकरे गटांनी जाहीर केल्या आहेत. त्यातील मोजक्या तीन ते चार जागांवर काही ठिकाणी काँग्रेसचे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारी संदर्भात पुन्हा एकदा पुनर्विचार केला जावा अशी मागणी त्या पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटाला करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या आग्रहानंतर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या यादीतील काही नावे बदलण्याची तयारी दर्शवली होती. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील 65 उमेदवारांपैकी काही मोजकेच 3 ते 4 उमेदवारांच्या नावात बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.