लोणी काळभोर, (पुणे) : विधानसभा निवडणुकीमध्ये अवैधरित्या मद्याचे अड्डे सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ शहर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. या काळात पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टीची 3 हजार 45 लिटर तयार दारू व चारचाकी असा 8 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सतिश प्रकाश कचरावत, (वय – 43) आणि मानेश प्रकाश कचरावत (वय 35, रा. दोघेही, संतोषनगर, कंजारभट वस्ती, तरवडेवस्ती, महंमदवाडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ तपास पथकातीत अधिकारी व अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, संतोषनगर, कंजारभट, महंमदवाडी रोड पुणे येथे सचिन कचरावत व मानेश कचरावत हे दोघे राहत्या घराच्या पाठीमागे गावठी हातभट्टी दारु गाळण्याची तयारी करीत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस पथकाने संतोषनगर, कंजारभट, महंमदवाडी रोड पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली.
दरम्यान, सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण 3 हजार 45 लिटर तयार दारू, 87 कॅन व चार चाकी स्विफ्ट गाडी कार असा 8 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी विविध कलमान्वये वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ मानर्सिंग पाटील, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक, संजय गायकवाड, प्रशांत लटपटे, पोलीस हवालदार, संजय देसाई, दाऊद सय्यद, परशुराम पिसे, अमोल काटकर, स्नेहल जाधव, पोलीस शिपाई महादेव शिंदे, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, गणेश माने, श्रीकृष्ण खोकले यांच्या पथकाने केली आहे.