मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. अशातच दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि विद्यमान काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज राष्ट्रवादीत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. विधानसभेसाठी काँग्रेसने ज्या उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये नाव नसल्याने नाराज झालेल्या झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकी यांनी हातात घड्याळ बांधलं आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत झिशान सिद्दीकी यांचं नाव नाही.त्यामुळे ते नाराज झाले. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, यांच्यासोबत इतर काही नेत्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. यात संजय काका पाटील, निशिकांत पाटील आणि अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा समावेश आहे. निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली असून ते जयंत पाटलांविरोधात मैदानात उतरणार आहेत.