पुणे : हांडेवाडी रोड येथे एका रिक्षाचालकास जबर मारहाण करून त्याच्या जवळची रोख रक्कम जबरीने घेऊन गेलेल्या एका फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हांडेवाडी रोड येथे जुलै, २०२४, मध्ये ४ जणांनी एका रिक्षाचालकास जबर मारहाण करून त्याच्या जवळची रोख रक्कम जबरीने घेऊन गेले होते. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. मोहित रवी शेलार (वय, 19 वर्ष रा. श्रीराम चौक, हडपसर, पुणे) असे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचे नाव आहे.
काल (दि २४) रोजी कक्ष ६ हद्दीमध्ये स.पो. नि. कांबळे, पो.ना. मुंढे ,पो.हवा. सकटे व कारखिले असे निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना माहिती मिळाली कि, हांडेवाडी रोड या ठिकाणी आरोपी मोहित रवी शेलार हा साई मंदिर चौक, काळेपडळ, हडपसर, पुणे येथे उभा आहे.
पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून आरोपी मोहित शेलार हा फरार होता.आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करिता कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देणार असल्याची माहिती कक्ष ६, पुणे शहरचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद अ. पठाण यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.