रोहोकडी: ओतूर (ता. जुन्नर) येथे मावशी बरोबर कपडे धुण्यासाठी मांडवी नदी किनारी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सार्थक गोरख शिंदे (वय ८, रा. ओतूर ता. जुन्नर जि. पुणे) असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओतूर येथील मांडवी नदी केटी बंधारा येथे मंगळवारी सानिका अमोल कोकाटे या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी सार्थक हा देखील मावशी बरोबर आला होता. सार्थक यावेळी तिथे असलेल्या मुलांसोबत खेळत होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान सार्थक शिंदे हा दिसत नसल्याने त्याची मावशी सानिका कोकाटे यांनी शोधा शोध केली असता सार्थक कुठे आढळून आला नाही. त्यानंतर बेपत्ता झालेल्या सार्थकचा शोध घेण्यासाठी सर्वजण नदी तीरावर आले. त्यावेळी त्याठिकाणी सार्थकची चप्पल आढळून आली. त्यावेळी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचा त्यांना संशय आला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक यांनी या घटनेची माहिती ओतूर पोलिसांना दिली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिसांनी व ग्रामस्थांनी मांडवी नदी प्रवाहात शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. २३) सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान नगर- कल्याण महामार्गाच्या पुलाच्या खाली मांडवी नदी पात्रात सार्थकचा मृतदेह आढळून आला आल्याचे स्थानिकांनी सांगितले.