दौंड : दौंड मतदारसंघात महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा असेल, हे फिक्स झाले आहे. मात्र या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार रमेश थोरातही इच्छुक होते. मात्र दौंड मतदारसंघ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून थोरात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. थोरात यांनी स्वत:ही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना थोरात-पवार भेट झाली. त्यामुळे लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाची दाट शक्यता आहे.
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात अन् सुप्रिया सुळेंची देखील भेट झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रमेश थोरात आता हातात तुतारी घेणार यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. बारामतीत शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंसोबत भेट घेतली गेली. मात्र या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे जयंत पाटील व रमेश थोरात यांची भेट झाली आहे. यावेळी जयंत पाटील साहेबांनी लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
रमेश थोरात हे सक्षम उमेदवार असल्याने येत्या दोन दिवसांत त्याबाबत योग्य निर्णय होईल असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पक्षप्रवेश सोहळा कधी होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नुकतेच रमेस थोरात म्हणाले की, गावा-गावात आणि वस्तीवर जाऊन बैठका घेतलेल्या आहेत आणि तिथे सगळ्यांचा सुर एकच आहे. एक तर पहिली तुतारी यावी, तुतारीचं चिन्ह पहिलं मिळालं तर त्याला पहिलं प्रधान्य देण्यात याव. जर तुतारी दिली नाही तर अपक्ष निवडणूक लढावी लागेल. अशा प्रकारे मतदारांनी त्यांना अटी घातलेल्या आहेत. असे मत रमेश थोरात यांनी व्यक्त केले आहे.