पुणे: सीईटी सेलकडून राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस (एमबीए इंटिग्रेटेड आणि एमसीए इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी मूळ कागदपत्रे अपलोड करावी लागणार होती. मात्र, राज्य सरकारने इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही. असे असतानाही संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा सीईटी सेलने दिला आहे. त्यामुळे या विद्याथ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.
सीईटी सेलमार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रथमच बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस (एमबीए इंटिग्रेटेड आणि एमसीए इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून मूळ प्रमाणपत्राऐवजी पावती अपलोड केली असल्यास, या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीच्या अंतिम दिनांकापर्यंत मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मूळ प्रमाणपत्र सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांचे प्रवेश संगणक प्रणालीद्वारे आपोआप रद्द करण्यात येणार आहेत, असे संदेश विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्यास, त्यांनी २३ ऑक्टोबरच्या दुपारी ३ पर्यंत स्वतःच्या खात्यामधून मूळ प्रमाणपत्र ऑनलाइन अपलोड करावे. त्याचप्रमाणे मूळ प्रमाणपत्र महाविद्यालयात जमा करावे, अशा सूचना सीईटी सेलने दिल्या होत्या. राज्य सरकारने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २२ जुलैला, तर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबर रोजी निर्णय प्रसिद्ध करत, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, अशीच मुदतवाढ एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही.