पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे विमानतळावरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्याहून वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या 11 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. एक्सवरून एका नामांकित एअर कंपनीच्या मॅनेजरला द्विट करत उडवूनन देण्याची धमकी मिळाली असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या कंपनीच्या मॅनेजरला एक मेल आणि एक्स पोस्ट आली असून, यामध्ये या आरोपीने पुण्याहून परदेशासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार आहे. अशी धमकी दिली आहे. या धमकीमुळे विमानतळासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही विमाने दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कलकत्ता यासह वेगवेगळ्या शहरात निघाली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डुमना विमानतळालाही धमकी..
एका अज्ञात व्यक्तीने मध्य प्रदेशातील जबलपूर येथील डुमना विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती, मात्र तपासादरम्यान ही धमकी खोटी असल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद कलादगी यांनी पीटीआयला सांगितले की, “कॉलरने विमानतळ अधिकाऱ्यांना सांगितले की, इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे.” मात्र हा धमकीचा फोन खोटा निघाला. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या अधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.