पुणे : पुण्यात वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने रस्ता सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात रस्ते अपघातात वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे पुणे विभागातील सर्वच जिल्ह्यांमधील सर्व शासकीय आणि निमशासकीय तसेच मनपा, नगरपालिका कर्मचा-यांना हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
यासंबंधीचे परिपत्रक डॉ. पुलकुंडवार यांनी जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चालविणा-या तसेच दुचाकीवर पाठीमागे बसणा-या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन करणे प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचा-याचे कर्तव्य आहे.
कायदेशीर आदेशांचे पालन करण्यास अधिकारी/ कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत, अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई संबंधित कार्यालय प्रमुख यांनी कारवाई करायची आहे. तसेच कुचराई करणा-याविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगविषयक प्राधिका-यामार्फत दंड व मूळ सेवापुस्तकात नोंदही करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
जीवन अमूल्य असून प्रत्येक जीव वाचवणे महत्त्वाचे आहे हे तत्त्व लक्षात घेवून सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी रस्ते अपघात कमी होण्याच्या दृष्टीने स्वत:पासून सुरुवात करावी. तसेच या अनुषंगाने घ्यायवयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना म्हणून हेल्मेट वापरावे, असे आवाहन परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी अनेकदा हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर काही दिवस कारवायाही झाल्या, मात्र हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी आतापर्यंत केराची टोपली दाखवली आहे. रस्त्यावरील अपघात अनेकदा किरकोळ असतो. शरीरावरील जखमाही गंभीर नसतात. पण डोक्याला मार लागल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.