पुणे : फुगेविक्रेत्या महिलेच्या पाच वर्षीय चिमुकलीवर नराधमाने बलात्काराचा केलेला प्रयत्न तरुणाच्या सतर्कतेमुळे फसला. ही धक्कादायक घटना येरवड्यातील ट्रम्प टॉवर समोरील मोकळे मैदानातील बंद पडलेल्या बांधकामाच्या बेसमेंटजवळ शनिवारी रात्री अकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
राम टेकबहादूर (वय ३५, रा. हरीनगर, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तर नवनाथ अडागळे असे सतर्कता दाखविणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला दिवसभर फुगे विकून रात्री आपल्या तीन मुलींसह या बंद पडलेल्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये झोपल्या होत्या.
त्यावेळी आरोपीने त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीला त्यांच्या जवळून झोपेतून उचलून घेऊन गेला. आरोपीने चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळी तिला जाग आल्याने चिमुरडी मोठ्याने रडू लागली.
त्यावेळी नवनाथ अडागळे यांना मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. अशा ठिकाणी मुलगी का रडते, हे पाहण्यासाठी तो गेला असताना समोर हे दृश्य दिसले. तरुणाने नराधमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले .
नवनाथ अडागळे याच्या दक्षतेमुळे एक चिमुरडी अत्याचारापासून वाचली आहे. ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाताडे करीत आहेत.