पुणे : ‘डॉक्टरसाहेब, कृपया माझी किडनी घ्या; पण मला दीड लाख रुपये द्या,” शेतमजुराची ससून रुग्णालयातील डॉक्टरांना रविवारी (ता.२७) आर्त हाक दिली. मात्र, या प्रकाराने काही काळासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरही गोंधळून गेले.
भिका अडागळे (वय ५६, रा. गव्हाणवाडी, ता. पाटण, जि. सातारा) अशी केविलवाणी विनवणी करणाऱ्या शेतमजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिका अडागळे हे रविवारी भल्या सकाळीच ससूनमधील अपघात विभागात (कॅज्यूअल्टी वॉर्ड) आले होते. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना वाटले की, काही तपासणी करायची म्हणून ते आले असावे. परंतु, तपासणीऐवजी अडागळे डॉक्टरांना म्हणाले, ‘डॉक्टरसाहेब, कृपया माझी किडनी घ्या; पण मला दीड लाख रुपये द्या,” अशी भलतीच मागणी केली. त्यामुळे डॉक्टरही बुचकळ्यात पडले.
त्यानंतर डॉक्टरांनी त्या शेतमजुराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कायद्याने असे करता येत नाही, असे सांगितले, परंतु, अडागळे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. शेवटी ससूनमधील वैद्यकीय समाजसेवा अधीक्षकांकडून त्यांचे समुपदेशन करण्याचे ठरले.
सातारा येथील शेतकरी भिका अडागळे यांनी दोन मुलींच्या लग्नासाठी काही वर्षांपूर्वी तीन ते चार जणांकडून कर्ज काढले होते. त्याबदल्यात ते एकाच्या शेतावर काम करीत आहेत. त्यातील काही पैसे परत केले आहे. मात्र आता काम होत नसल्याने शेतकऱ्याने वरील आर्त विनवणी डॉक्टरांकडे केली आहे.
दरम्यान, सर्व पैसे परत करू न शकल्याने संबंधित सावकार मारहाण करत असल्याचे अडागळे यांनी सांगितले. सावकाराच्या दबावाला घाबरून अद्याप कोणाकडेही तक्रार केलेली नाही. यावरून हा वेठबिगारीचा प्रकार असल्याची देखील शक्यता आहे.