पुणे: आता मोबाईलवरून उमेदवार, मुख्यमंत्री आणि तुमची पसंती कोणाला, असा सर्व्हे सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींचीही विचारपूस करत तुमच्या मतदारसंघातील उमेदवार महायुती की, महाविकास आघाडीचा असणार याविषयी विचारपूस केली जात आहे. उमेदवार निश्चिती ४ नोव्हेंबर रोजी होणार, हे सांगण्यासाठी कोणाचीही गरज नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीतील उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत. त्यांच्याच रांगेत आता बसपा, वंचित, तिसऱ्या आघाडीसह अपक्षांनी निवडून येण्याचा चंग बांधला आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील बहुतेक सर्व उमेदवारांना एबी फॉर्म मिळाल्याने फटाके वाजवत, पेढा भरवून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याचबरोबर मोबाईलवरून लाडक्या बहिणींची चौकशी करण्याचे निमित्त साधत तुमच्या मतदारसंघात उमेदवार कोण असावा, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला पसंती देणार, अशी विचारणा केली जात आहे. काही चोखंदळ मतदार मात्र उमेदवार, मुख्यमंत्री कोण, लाडकी बहीण योजनेविषयी विचारताच म्हणतात, लाडकी बहीण झाली, आता लाडका भाऊ कधी जाहीर करणार आहात? काही मतदारसंघात पैठणी मिळाली, दिवाळीचे कीटही मिळणार आहे. तुम्ही कधी देणार, त्यापेक्षा महागाई कमी कधी करणा? असे प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे मोबाईलवरून चौकशी करणारे पळवाट काढत बोलणे टाळत असल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी आणि अपक्षांमधील उमेदवारांनी ‘अभी नही तो कभी नही,’ असे म्हणत प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षाचे तिकीट मिळाले नाही, तरी अपक्ष लढणार अशीच काहीशी भूमिका दिसत आहे. काहींची नेहमीप्रमाणे सेटलमेंट होणार अशी अटकळ जाणत्या कार्यकर्त्यांनी सांगितली आहे.