पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. असं असताना पुण्यातील खेडशिवापुर टोल नाक्यावर सोमवारी संध्याकाळी राजगड पोलिसांनी पाच कोटी रक्कमसह एक वाहन पकडले होते. दरम्यान, कारमधील ५ कोटी कोणाचे, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या कारमधील चार जणांना पोलिसांनी ताब्यात असून हे वाहन पश्चिम महाराष्ट्रातील एका मोठ्या आमदाराशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
पाच कोटी कोणाचे? पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमधील पाच कोटी कंत्राटदाराचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाच कोटींची रक्कम घेऊन जाणाऱ्या कारमध्ये चार जण होते. सागर सुभाष पाटील, रफीक अहमह नजीर, बाळासाहेब आण्णासाहेब आसबे, शशिकांत तुकाराम कोळी अशी कारमधील व्यक्तींचे नावे आहेत. या कारमधील सर्व जण सांगोल्यातील राहणारे आहेत. यातील बाळासाहेब आसबे हे कंत्राटदार आहेत. तर शशिकांत तुकाराम कोळी हे चालक आहेत.
याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले की, काल संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाची गाडी चेक पोस्टवर आढळून आली. मुंबईहून कोल्हापूरला निघालेल्या या गाडीत पाच कोटी रुपये आढळून आले असून ही रक्कम कंत्रादारांची आहे. या घटनेची माहिती निवडणूक आयोगाला कळवली असून सर्व रक्कम ट्रेझरीला जमा केली आहे. जप्त केलेली रक्कम ही खरी आहे. बँक अधिकारी यांनी तपासले असून या नोटा खोट्या नाहीत, असं पंकज देशमुख यांनी सांगितले आहे.