पुणे : पुण्यातील विधी महाविद्यालय रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी चंदन चोरट्यांना हटकले. यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, चोरट्यांनी हल्ला केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ बीट मार्शल पोलिस शिपायाने चोरट्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. हा थरार सोमवारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुमारास घडला आहे. या घटनेत डेक्कन पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई एस तांबे हे जखमी झाले आहेत.
नेमक काय घडलं?
शहरातील विधी महाविद्यालय रस्ता परिसरात मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिस शिपाई तांबे आणि त्यांचे सहकारी गस्त घालत होते. त्यावेळी चोरटे प्रभात रस्त्यावर एका गल्लीत शिरले. या परिसरातील एका सोसायटीतील चंदनाचे झाड कापण्याच्या तयारीत संबधित चोरटे होते. त्यावेळी चोरट्यांना पाहून पोलिसांना संशय आला.
त्यांनी चोरट्यांना थांबवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाच ते सहा चोरट्यांनी पोलीस शिपाई तांबे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला चढवला. यावेळी झटापटीत तांबे यांच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी तांबे यांनी पिस्तूलातून चोरट्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पालीन गेले.
या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून डेक्कन पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.