चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाघिणी ओडिशाच्या जंगलात पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या दोन वाघिणींचा शोध सुरु असून वाघिणी सापडल्यानंतर त्या ओडिशाला रवाना केल्या जाणार आहेत. यानंतर सिमलीपल व्याघ्र प्रकल्पात सोडल्या जाणार आहेत.
ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात वाघिणींची संख्या कमी झाली असून त्यामुळे ओडिशा राज्य सरकारने प्रजनन आणि ओघानेच वाघांच्या वाढीसाठी वाघिणींची गरज NTCA कडे नोंदवली आहे. त्यानुसार ही गरज आता चंद्रपूर जिल्ह्यातून भागवली जाणार आहे. त्यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या वाघिणींचा शोध घेतला जात आहे. दोन वाघिणी पाठवायच्या असल्या तरी शोध अनेक वाघिणींचा घेतला जात आहे. ताडोबा कोअर, बफर आणि संरक्षित जंगलात हा शोध सुरू आहे. अजूनपर्यंत अशा वाघिणी सापडलेल्या नाहीत.
या वाघिणी ज्यावेळी पकडल्या जातील, तेव्हा लगेच त्या ओडिशाला रवाना केल्या जाणार असल्याचे समजते. यापूर्वीही अशा रीतीने इथले वाघ राज्यात इतरत्र पाठवण्यात आले आहेत. पण ते वाघ प्रामुख्याने हल्लेखोर होते. यावेळी मात्र इथे रमलेल्या वाघिणी पकडायच्या असून ओडिशासारख्या दूरवरच्या राज्यात सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे ओडिशा वन विभागाची जबाबदारीमध्ये वाढ होणार आहे.