सोलापूर : लातूर येथे कार्यरत असणारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीने सोलापुरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
स्नेहलता प्रभू जाधव (वय ४५, रा. लातूर) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या लग्नाच्या बस्ता खरेदीसाठी लातूर येथील स्नेहलता जाधव या त्यांचे पती व नातेवाईकांसह कर्नाटकातील चडचण येथे गेल्या होत्या. शनिवारी रात्री घरी परतण्यासाठी उशीर झाल्याने ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते.
मात्र रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमित्त लातूरला गेले आणि त्यानंतर हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन स्नेहलता जाधव यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
स्नेहलता जाधव यांनी गळफास घेण्यापूर्वी आपल्या एका नातेवाईकाला फोन करत मी आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं होतं. दुपारी स्नेहलता यांनी लातूर येथील एका नातेवाईकाला फोन केला आणि रडतच मी माझं जीवन संपवणार आहे, असं त्या म्हणाल्या. सदर नातेवाईकाने ताबोडतोब ही माहिती सोलापूर येथे असणाऱ्या आपल्या परिचितांना दिली. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांचे नातेवाईक हॉटेलवर पोहोचले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान, नातेवाईक हॉटेलवर पोहोचेपर्यंत स्नेहलता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नातेवाईकांनी त्यांना ताबोडतोब जवळच्या रुग्णालयात नेले मात्र, तेथील डॉक्टरांनी स्नेहलता यांना मृत घोषित केले.
त्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.