लहू चव्हाण / पाचगणी : मित्रांसोबत भिलार पाझर तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा अद्यापही शोध लागला नाही. काल रविवारी (दि. 20) दुपारी साडेचारच्या सुमारास पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेला जयदीप मुकुंद भिलारे (वय-२६, रा. भिलार, ता. महाबळेश्वर) पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तेव्हापासून जयदीपचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमने शोध कार्य सुरु केले होते. मात्र, अद्यापही त्याचा शोध लागला नाही.
नेमकं काय घडलं?
मित्र पाण्यात उतरले असता जयदीपलाही पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याला चांगले पोहता येत नव्हते. तो पाण्यात उतरल्यानंतर पोहत काही अंतर पुढे गेल्यावर तो बुडू लागला. त्यावेळी त्याने वाचवा वाचवा असा आवाज दिला. परंतु काही वेळातच तो खोल पाण्यात बुडाला. यावेळी गावातील मुलांनी तलावात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पांचगणी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
महाबळेश्वर ट्रेकर्स रेस्क्यू टीमच्या आणि पांचगणीतील ऐस. ओ. ऐस. टीमच्या जवानांनी रात्री उशिरा सात वाजता शोध मोहीम सुरू केली. परंतु लाईटच्या उजेडात काहीही यश आले नाही. त्यामुळे ही मोहीम रात्री उशिरा थांबवण्यात आली. त्यानंतर आज सकाळी ही मोहीम सुरू केली. पाणबुडी आणली त्यांनीही सकाळपासून तब्बल १२ तास शोध मोहीम राबवली, तरीसुद्धा जयदीप सापडू शकला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या जवानांनी शोध मोहीम थांबवली.