नसरापूर : राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज सायंकाळच्या सुमारास एका वाहनामधून काही रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली.
त्यानुसार राजगड पोलिसांनी संबंधित वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये तब्बल ५ कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांना मिळून आली. तसेच सदर वाहन हे सत्तेतील एका बड्या आमदाराचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर रक्कम आणि इनोव्हा क्रिस्टा कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एमएच ४५ एएस २५२६ पोलिसांनी जप्त केले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग तसेच तहसिलदार, प्रांतअधिकारी आदी दाखल झाले आहेत. तसेच आयकर विभाग, फाईंग स्कॅाड देखील भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. सदर वाहनात चार व्यक्ती असून यामध्ये एकजण संबंधित आमदाराचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. राजगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.