लोणी काळभोर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या शुभम काळभोर याने आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 73 किलो वजन गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकासह स्पर्धेतील मानाचा बेस्ट लिफ्टर हा पुरस्कार मिळविला आहे.
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात पुणे जिल्हा अंतर्गत आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाविद्यालयाचा खेळाडू शुभम याने 73 किलो वजन गटातील स्नॅच या प्रकारात सर्वात जास्त 115 किलो व क्लीन व जर्क या प्रकारात देखील सर्वात जास्त 140 किलो वजन उचलून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेमधील बेस्ट लिफ्टर हा किताब देखील शुभम याने पटकावला.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शुभमची 25 व 26 ऑक्टोबर रोजी विंझर येथील अमृतेश्वर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए के मंजुळकर यांनी शुभमचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.