-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : शाळांमध्ये भौतिक सुविधा देताना शिक्षण विभागाकडून यू- डायसच्या माहितीचा आधार घेतला जातो. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी स्कूल, स्टुडंट व टीचर या तिन्ही पोर्टलवर ऑनलाइन माहिती भरण्यासाठी सुरुवात केली आहे. यू-डायस पोर्टलमध्ये (U-Dice Portal) कोणताही विद्यार्थी अथवा शिक्षक डुप्लिकेट होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. ड्रॉप बॉक्समध्ये असलेले विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष शिकत असल्यास त्यांना तत्काळ समाविष्ट करून घ्यावे लागणार आहे, अशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.
माहिती भरण्यासाठी मुख्याध्यापकांना शिक्षकांची मदत घेता येणार आहे. यात चुकीची माहिती भरली गेल्यास शाळांना मिळणाऱ्या सुविधा, विद्यार्थी योजना व शिक्षकांना फटका बसणार आहे. शिवाय, माहिती भरण्यास कुचराई करणाऱ्या मुख्याध्यापकांवरही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शाळांना लागणाऱ्या वर्गखोल्या, शौचालय, सुरक्षाभिंतीसह अन्य सुविधांसाठी लागणारा निधी यू- डायस माहितीच्या आधारे दिला जातो. गणवेश, पुस्तकांची संख्याही याच आधारावर निश्चित केली जाते. ही माहिती मुख्याध्यापकांना दिलेल्या शाळेच्या लॉगिनमधून पूर्ण भरायची आहे. स्कूल पोर्टलमध्ये शाळेत असणाऱ्या मूलभूत व भौतिक सुविधांची माहिती भरायची आहे. यात हात धुण्याची सुविधा, डस्टबिन, विविध समित्यांचे गठण यांचा समावेश आहे.
सुविधा पूर्ण करूनही माहिती अपडेट करता येणार आहे. स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, रक्तगट आदी माहिती पूर्ण भरावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले आहे. टीचर पोर्टलमध्ये शाळेत कार्यरत सर्व शिक्षकांची माहिती नोंदवायची आहे. नव्याने रुजू झालेले अथवा बदलून गेल्यास त्यात सुधारणा करावी लागणार आहे. ही सर्व माहिती बिनचूक भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत