उरुळी कांचन, (पुणे) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी पदाधिकाऱ्यांसह सोमवारी (ता. 21) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे शिरूर हवेलीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच कटके यांच्या प्रवेशामुळे शिरूर-हवेलीची जागा राष्ट्रवादीला सुटणार हे नक्की झाले आहे. महायुतीकडून कटके हेच उमेदवार असणार आहेत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद आणि शिरूर-हवेली राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी काय भूमिका घेणार? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वांचे लक्ष आता जागा वाटपाकडे लागले आहे. पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच माऊली कटके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने महायुतीकडून तिकीट कोणाला मिळणार? याकडे शिरूर – हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिरुर-हवेली मतदारसंघातील या जागेसाठी महायुतीत जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.
माऊली आबा कटके यांच्यासह पूर्व हवेलीतील कोलवडीचे सरपंच विनायक गायकवाड, नाना गुलाब गायकवाड, पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी, नायगावचे माजी सरपंच गणेश चौधरी, संतोष हगवणे, सुजित चौधरी, सुनील हगवणे, प्रतिक चौधरी, रवींद्र शेलार, शिवाजी चौधरी, वाघेश्वर उद्योग समूहाचे गणेश सातव यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांपैकी ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी प्रचारात प्रचंड लक्षणीय आघाडी घेतली असून तीर्थक्षेत्र दर्शनाचा त्यांचा फॉर्म्युला या निवडणुकीत “गेमचेंजर” ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा अनपेक्षित निकाल लागेल, अशी चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.
दरम्यान, विद्यमान आमदार अशोक पवार हे सलग चौथी निवडणुक लढवत आहेत. त्यांचा मोठा गट शिरूर तालुक्यात आहे. त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली असून त्यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांचे नावही भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यातच ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केल्याने शिरूर – हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.