नवी दिल्ली : फेसबुकची कंपनी मेटाने कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, कर्मचारी कपातही झाली आहे. असे असताना आता मेटाच्या पावलावर पाऊल ठेवत नोकियानेही कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता नोकियाने तब्बल 2000 कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ दिला आहे.
नोकिया युरोपमध्ये 350 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. नोकियाचे बीजिंग आणि शांघाय, तसेच हाँगकाँग आणि तैवान येथे कार्यालये आहेत. यांसारख्या ठिकाणांहून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नोकियाने 2026 पर्यंत 800 दशलक्ष युरो ते 1.2 अब्ज युरोदरम्यान बचत करण्यासाठी 14,000 नोकऱ्या कमी करण्याची घोषणा आधीच केली होती. त्यानुसार, आता ही कपात केली जात आहे.
कंपनीच्या अहवालानुसार, डिसेंबर 2023 पर्यंत नोकियाचे ग्रेटर चीनमध्ये 10,400 कर्मचारी आणि युरोपमध्ये 37,400 कर्मचारी होते. नोकियाने गेल्या वर्षी नोकऱ्या कपातीची घोषणा केली, तेव्हा त्यांचे एकूण कर्मचारी सुमारे 86,000 होते. ही संख्या 2026 पर्यंत 72,000 ते 77,000 पर्यंत कमी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. नोकियामध्ये सध्या अंदाजे 78,500 कर्मचारी असल्याची माहिती दिली जात आहे.