पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे अजूनही पडसाद पडत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांवर आज पुन्हा ट्विट करताना हल्लबोल केला. यात राज्यपाल कोश्यारीवर अजूनही कारवाई झाली नाही हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने अधोरेखित केला.
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !#कोश्यारी_हटाओ
आज छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करताना हा सवाल उपस्थित केला. राज्यपालांच्या व्यक्तव्यावर राज्यकर्ते सहमत आहेत का ? असा प्रश्न विचारताना सत्ताधारी शिंदे – फडणीस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्याबरोबरीने त्यांनी शिवभक्तांच्या भावना समजत नसलीत तर उठाव होणारच असे म्हणत सत्ताधारी पक्षाला पुरते घेरले आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे व उदयनराजे यांनी आतापर्यत कणखर भूमिका घेतली आहे. याबाबत दोन्ही नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणारे पत्र राष्ट्रपती मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.