पिंपरी : अवैध धंदे रोखण्यास अपयश आल्याचा ठपका ठेवून पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ४ पोलीस कर्मचारी निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. सतीश जालिंदर, विलास केकाण, राहुल मिसाळ आणि नितीन सपकाळ असे निलंबित करण्यात आलेल्या निगडी पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी देहुरोड, निगडी आणि वाकड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील लॉटरी सेंटर, व्हिडिओ गेम पार्लर, सोरट जुगार अड्यांवर १५ नोव्हेंबरला कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल ३९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते.
या अवैध धंद्याला अभय देणाऱ्या पोलिसांविरोधात पोलिस आयुक्तांनी कारवाईचे संकेत दिले होते. संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचारी, अधिकारी यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. निगडीचे पोलिस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तर, तीन सहायक निरीक्षकांसह २१ पोलिस कर्मचाऱ्यांची वाहतूक विभागाअंतर्गत बदली करण्यात आली.
दरम्यान, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ५ अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आयुक्तांनी निगडी पोलिस ठाण्यातून अहवाल मागवला होता. त्या अहवालानुसार निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांवर अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी होती. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवून आयुक्त अंकुश शिंदे यांनी चारही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.