पुणे : सोशल मिडियावर अपलोड करण्यासाठी रेल्वे मार्गावर फोटोशूट व ‘रिल’ बनवणाऱ्या दोघांना चिंचवड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
विक्रमसिंह जोधसिंह राठोड (वय-२५), महेशभाई रत्नाभाई रबारी (वय -१८, दोघेही रा. भीमाशंकरनगर, मुकाई चौक, रावेत, देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगडेवाडी-देहूरोड रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी (ता. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विक्रम आणि महेशभाई रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करीत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक ए. के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी. एन. लाड, कर्मचारी बी. पी. पवार, समाधान बागुले यांनी तत्काळ तेथे धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.
विक्रम आणि महेशभाई रेल्वे ट्रॅकवर पुशअप्स; तसेच वेगवेगळ्या पोझमध्ये, फोटो, व्हिडिओ काढत होते. ते फोटो व्हिडिओ त्यांना सोशल मीडियावर अपलोड करायचे असल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर फोटो, व्हिडिओ काढणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे धोकादायक आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे अपघात होऊन त्यात अनेकांचा मृत्यू होतो. असे मृत्यू टाळण्यासाठी रेल्वे विभागाने ‘मिशन झिरो डेथ’ सुरू केले आहे. रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर एक वर्ष कारावास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. रेल्वे ट्रॅकवर जाऊन फोटो, व्हिडिओ काढू नका, अन्यथा कारागृहात जावे लागेल, असा इशारा रेल्वे पोलिसांनी केले आहे.