पुणे : भारताचे विद्यमान सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड येत्या रविवारी (दि. २०) कनेरसर (ता. खेड) गावाला भेट देणार आहेत, अशी माहिती लेखक अशोकराव टाव्हरे यांनी दिली. कनेरसर हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे गाव आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होणार आहेत. कनेरसर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आपल्या गावी भेट देत असून, ही घटना अभिमानास्पद आहे. ग्रामस्थांच्या वतीने जंगी मिरवणूक काढून मानपत्र देऊन सन्मान करणार आहे, असे सरपंच सुनीता केदारी, अनंत चंद्रचूड, दिलीपराव माशेरे यांनी सांगितले.
सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंतराव चंद्रचूड हे १९७८ ते १९८५ असे सात वर्षे भारताचे सरन्यायाधीश होते. सर्वाधिक कालावधी त्यांना लाभला होता. तर, यशवंतराव चंद्रचूड यांचे वडील विष्णू चंद्रचूड हे १९१२ मध्ये एलएलबी परीक्षेत प्रथम, स्वतः यशवंतराव चंद्रचूड हे १९४२ मध्ये व त्यांची मुलगी १९७१ मध्ये एलएलबी परीक्षेत प्रथम आले होते. चंद्रचूड घराण्याची आगळीवेगळी हॅट्ट्रिक म्हणून यास ओळखले जाते.
देशातील अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांचे योगदान आहे. न्या. भगवती पिता-पुत्रानंतर सरन्यायाधीशपदी नियुक्त होणारी न्या. चंद्रचूड पिता-पुत्रांची भारतातील दुसरी जोडी आहे. यशवंतराव चंद्रचूड हेसुद्धा सरन्यायाधीश असताना १९८५ मध्ये कनेरसरला आले होते. त्याचप्रमाणे स्वतः सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड हे कनेरसर गावाला भेट देत असल्याने आठवणींना उजाळा मिळाल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.