पुणे : पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता जेवणात खर्डा न दिल्याने महिलेवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि. १३) शहरातील येरवडा भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला. सुप्रिया पंकज पाचारणे (वय-४०, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत सुप्रिया यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी पंकज मच्छिंद्रनाथ पाचारणे (वय-४३) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज रिक्षा चालवतो. रविवारी सायंकाळी तो घरी आला. त्याने पत्नी सुप्रिया यांना मिरचीचा खर्डा करुन देण्यास सांगितले. तेव्हा तुम्ही मिरची घेऊन या. मी खर्डा करून देते, असे सुप्रियाने त्यांना सांगितले. या कारणावरून पंकज चिडला आणि त्यांच्या कानाखाली मारली.
तेव्हा त्यांचा मुलगा आर्यनने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वयंपाक घरातून चाकू आणला. आर्यनला मारण्यासाठी चाकू उगारला. झटापटीत सुप्रिया यांच्या डाव्या डोळ्याजवळ चाकू लागल्याने त्या जखमी झाल्या. याप्रकरणी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार तेजपाल करत आहेत.