मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता शहरात अजून एका राजकीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना काल संध्याकाळी मालाड पूर्वेत स्टेशनजवळ घडली आहे. आकाश माईन (वय २७ वर्ष) असं हत्या करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेतला जात आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मालाड पूर्वेत दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. माईन हे दसरानिमित्त काल संध्याकाळी नवीन गाडी घेण्यासाठी मालाड स्टेशनवर गेले होते. त्यावेळी मालाड पूर्वेत स्टेशनजवळ रिक्षावाल्याने कट मारल्यामुळे मनसे कार्यकर्ता आणि रिक्षावाल्याबरोबर बाचाबाची झाली.
यावेळी रिक्षा चालकाचा मित्र फेरीवाल्यांनी गर्दी जमा करून दहा ते बारा लोकांनी मनसे कार्यकर्त्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मनसे कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रात्री बारा वाजता मनसे कार्यकर्ता माईनचा मृत्यू झाला. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मनसेचा पोलिसांवर आरोप
मनसेकडून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह? उपस्थित केले जात आहेत. बाबा सिद्दिकी यांना वेगळा न्याय आणि मनसे कार्यकर्त्याला वेगळा न्याय का? असा सवाल मनसेकडून उपस्थित केला जात आहे. ज्या पद्धतीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवून दोन आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपीचे शोध घेत आहेत. त्याच पद्धतीने पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी तपास वेगाने केला पाहिजे.