जुन्नर: महाराष्ट्र शासनाकडून जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र उंब्रज, खोडद, बोरी बु., गुंजाळवाडी (आर्वी) या चार गावांतील तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
राज्य सरकारकडून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र योजनांतर्गत मोठ्या तीर्थक्षेत्र स्थळांना मान्यता देण्यात आलेल्या आहेत. त्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच लोकप्रतिनिधी यांचीही संबंधित स्थळांना दर्जा देण्याबाबतची मागणी वाढत आहे. जुन्नर तालुक्यातील ७ तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा देण्याबाबत आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. यामधील ४ तिर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात आला आहे.
दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद व पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांच्या समितीने या सर्व प्रस्तावांची छाननी करून त्यासाठी पात्र स्थळांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याबाबतची कार्यवाही करावी व याबाबत अंतिमः उपमुख्यमंत्री यांची मान्यता घेण्याबाबतची सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती.
या तीर्थक्षेत्रांचा समावेश
यामध्ये श्रीक्षेत्र महालक्ष्मी देवस्थान उंब्रज नं. १, श्रीक्षेत्र मुक्ताबाई जगदंबा मंदिर देवस्थान खोडद, श्री सिद्धेश्वर मंदिर बोरी चु., श्री श्रीराम पंचायतन ट्रस्ट गुंजाळवाडी (आर्वी) या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल उंब्रज, खोडद, बोरी बु., गुंजाळवाडी (आर्वी) या गावांच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.