पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश प्राप्त झालं आहे. या प्रकरणी एका आरोपीला वारजेतून अटक करण्यात आली आहे, तर उरलेल्या दोन आरोपींचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून तिघांपैकी दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. हे आरोपी गुन्हा करण्यापूर्वी एका वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी एकत्र आल्याचं सीसाटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. या फुटेजमध्ये पीडितेच्या मित्रानं आरोपींना ओळखलं आणि त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. अख्तर, सोम्या आणि चंद्रशेखर अशी या तिन्ही नराधमांची नावं आहेत.
अशी आहे नराधमांची कुंडली..
बोपदेवमध्ये तरुणीवर अत्याचार केलेले तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून या तिघांवर याआधीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर यातल्या एकावर याआधीही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी 20 किमी अंतरासाठी 80 किमीपेक्षा जास्त प्रवास केला. बोपदेव प्रकरणातले तीनही आरोपी हे मध्य प्रदेशचे असून मागच्या काही वर्षांपासून पुण्यात कचरा वेचण्याचं काम करतात. बोपदेव घाटातल्या घटनेच्या रात्री तिन्ही आरोपींनी येवलेवाडीतल्या बिअर शॉपमधून बिअर विकत घेतली होती.
बिअर प्यायल्यानंतर तिन्ही आरोपी बोपदेव घाटात गेले आणि पीडित मुलीवर अत्याचार केले. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर ते बोपदेव घाटातून खाली उतरले. घाट उतरल्यानंतर तिन्ही आरोपी खेड शिवापूरला जाऊन पोलिसांना चकवा देण्यासाठी या तिघांनी वेगळा मार्ग निवडला आणि ते रात्रभर फिरत राहिले. या दरम्यानच्या काळात त्यांनी मोबाईलचाही वापर केला नाही. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर केला, तसेच पोलिसांनी 700 ठिकाणचे सीसीटीव्हीही तपासले. त्याद्वारे त्यांनी आरोपींचा माग काढला.