पुणे : विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, जुन्नर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुणे येथे दोन दिवसांपूर्वी घेतल्या. या मुलाखती दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते सत्यशील शेरकर हजर राहात मुलाखत दिल्याने जुन्नर मधील शरदचंद्र पवार पक्ष संघटनेत संभ्रम निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी गेले अनेक दशके अहोरात्र झटणारे ज्येष्ठ नेते शरदराव लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले हे सर्व प्रबळ इच्छुक आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध टिकवण्याचे काम या महत्त्वाच्या नेत्यांनी केले होते. मात्र, आमदारकीच्या तिकिटासाठी सत्यशील शेरकर यांच्या अचानक प्रवेशाची चर्चा जुन्नर तालुक्यात सुरू झाल्याने पक्ष संघटनेतील नेत्यांची अस्वस्थता व कार्यकर्त्यांमधील संभ्रम मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना याबाबत आपली अस्वस्थता कळवली असल्याचे समजते. परंतु तालुक्यातील एक-दोन नेत्यांच्या अट्टाहासापाई शेरकरांचा प्रवेश कार्यकर्त्यांवर लादला जात असल्याने येणाऱ्या विधानसभेला कार्यकर्त्यांमध्ये पक्षाचे काम करणार नसल्याची सुप्त चर्चा सुरु आहे.