अमरावती : भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवलेल्या माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना पत्राद्वारे सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे. हैदराबादहून हे धमकीचे पत्र स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या अमरावती येथील घरी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या पत्रामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. नवनीन राणा यांचे स्वीय साहायक विनोद गुहे यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे.
आमिर नामक इसमाच्या नावाचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. तसेच, राणा दाम्पत्याच्या अमरावतील घरासमोर गाय कापण्याची देखील धमकी पत्रातून देण्यात आली आहे. तर, पत्रात पाकिस्तान जिंदाबाद, असाही उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी शहरातील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
काय म्हणाले विनोद गुहे?
आज दुपारी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीतील निवासस्थानी एक निनावी पत्र आलं आहे. हे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव अमीर असल्याचे सांगितलं आहे. हैदराबादमधून त्याने हे पत्र पाठवलं असून त्याचे नातेवाईक दुबई आणि पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख या पात्रात करण्यात आला आहे, असे विनोद गुहे यांनी सांगितले.
मी तुमच्यावर सामूहिक अत्याचार करेन
तसेच पुढे बोलताना, तुम्ही हिंदूंबाबत बोलता. हे योग्य नाही. मी तुमच्यावर सामूहिक अत्याचार करेन तसेच मला १० कोटी रुपये द्या, अन्यथा मी तुमच्या घरासमोर गाय कापेन, अशी धमकीहीदेण्यात आली आहे. या पत्रासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी तत्काळ कारवाई करून पत्र पाठवण्याऱ्या व्यक्तीला अटक करण्यात यावी, अशी मागणी विनोद गुहे यांनी केली आहे.