लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर येथील प्रसिद्ध रामदरा शिवालय या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या चारचाकीला पुणे महानगर पालिकेच्या कचऱ्याच्या डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. 11) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत चारचाकीतील पाच जणांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर अपघात झाल्यानंतर डंपरचालक डंपर सोडून त्या ठिकाणावरून पळून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून पाच व्यक्ती या त्यांच्याजवळ असेलल्या चारचाकीतून लोणी काळभोर या ठिकाणी असलेल्या रामदरा शिवालय या ठिकाणी दर्शनासाठी निघाल्या होत्या. यावेळी सोलापूरच्या बाजूने कदमवाकवस्ती परिसरात निघाले असताना पाठीमागे असलेल्या भरधाव पुणे महानगर पालिकेच्या कचऱ्याच्या डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली.
यावेळी सदरची चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी थेट महामार्गावर आडवी झाली. यावेळी डंपरचालकाने गाडी 10 ते 15 फुट फरफटत नेली असल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. यावेळी चारचाकी हि पुणे – सोलापूर महामार्गाच्या दुभाजकावर आदळली.
दरम्यान, अपघात झाला यावेळी डंपरचालक त्या ठिकाणावरून पळून गेला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांनी चारचाकीतील नागरिकांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.