लोणी काळभोर : लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील माजी सरपंच सचिन तुपे यांना पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवावी लागल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थेऊर फाटा येथे शुक्रवारी (ता.11) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थेऊर फाटा येथे शुक्रवारी (ता.11) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरील पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाणारी एक लेन पूर्ण बंद झाली होती. महामार्गावर वाहनांच्या 1 ते 2 किलोमीटरपर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र थेऊर फाटा येथे कोणताही वाहतूक पोलीस वाहतूक नियमन बजावण्यासाठी उपस्थित नसल्याने कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील माजी सरपंच सचिन तुपे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धावून आले. आणि तब्बत अर्धातास वाहतूक कोंडी सोडवून पुणे सोलापूर महामार्ग सुरळीत केला. तर गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या वाहतूक पोलिसांचा पुन्हा एकदा नाकर्तेपणा समोर आला आहे.
दरम्यान, लोणी स्टेशन चौक हा रहदारीचा असल्याने या चौकात वारंवार छोटे मोठे अपघात होतात. या चौकातील वाहतूक नियमन करण्यासाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. त्यातील एक हजर तर दुसरा गायब झाल्याचे वारंवार दिसून येत आहे. तर कधी कधी वाहतूक पोलीस आडोशाला एका फ्रुट च्या स्टुलवर बसल्याचे आढळून येते. त्यामुळे या चौकातून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कामात काटकसर करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय कारवाई होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.