पुणे : बाईक सर्व्हिस विरोधात पुण्यातील रिक्षाचालकांनी 28 नोव्हेंबरपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. त्यांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. रॅपीडो कंपनीचे संचालक जगदीश पाटील यांच्यासह इतरांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात ऑनलाइनरित्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सर्व्हिस सुरु असल्याचे अनेक तक्रार रिक्षा संघटनांकडून पुणे आरटीओकडे आली हाेती. त्यानुसार आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांनी याबाबतचा तपास करण्यासाठी अनंत भोसले यांना सांगितले. त्यानुसार सदर खाजगी दुचाकी वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या रॅपीडो कंपनीस संबंधित सेवा बंद करण्यास सांगण्यात आले होते. याबाबत तीन नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या.
कंपनीने अॅप व वेबसाईटवरुन प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सक्षम प्राधिकरणाकडून परवानगी घेणे अनिवार्य होते परंतु ती त्यांनी घेतली नाही. राज्यात बाईक टॅक्सी याेजना सुरु होईपर्यंत सेवा पुरवली जाणार नाही असे कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले हाेते.
महाराष्ट्रात आतापर्यंत आरटीओने बाईक टॅक्सी या संवर्गात आजपर्यंत कोणताही परवाना, लायसन्स जारी केलेले नाही. संबंधित कंपनीने अशाप्रकारे बाईक टॅक्सी सेवेला परवानगी मिळावी म्हणून आरटीओकडे ईमेलवर अर्ज केला होता. परंतु तो फेटाळण्यात आला होता.